Monday, 5 May 2014

खरीच ‘दुसरी गोष्ट’


नचिकेत जोशी 

“चित्रपटात दाखविलेल्या सर्व घटना व पात्र काल्पनिक आहेत, त्यांचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तसे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.” दुसरी गोष्ट हा चित्रपट पाहताना तुम्हाला कितीही वाटले, की हा चित्रपट माननीय आणि अती सन्माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आधारीत आहे आणि केवळ त्यांच्यासाठीच आणि त्यांची महती गाण्यासाठीच तयार करण्यात आला आहे, तरीही तो निव्वळ योगायोग समजावा. त्यामुळे सुरवातीला काहीसे मनोरंजक वाटणारे कथानक अचानकपणे ‘दुसरी’कडेच निघून जाते आणि 
पडद्यावर दिसते ती ‘दुसरीच गोष्ट’!

चित्रपट नेमका काय आहे?

सोलापुरच्या एका वस्तीतील दहा-बारा वर्षांचे एक अवखळ पोर चैन भागविण्यासाठी छोट्यामोठ्या चोऱ्या करीत असते. अचानक एक घटना घडते आणि चोऱ्या करण्यापेक्षा शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे ते स्वतःच ठरवते. त्याची आई आणि काकी त्याला नेहमी एक गोष्ट सांगत असतात. ती म्हणजे, पहिली गोष्ट. यापेक्षाही वेगळी गोष्ट तयार करण्याचे काम चित्रपटाच्या नायकाकडे येते आणि तो कामाला लागतो. शाळेतून महाविद्यालयात जातो, कोर्टात फेमस ‘पट्टेवाल्याची’ नोकरी करत करत शिक्षण घेतो, मग पुढे तो अर्थातच फौजदार होतो. मध्ये त्याची दोन प्रेम प्रकरणेदेखील होतात. (नायक म्हटल्यावर नायिका आलीच, मग नायिका म्हटल्यावर त्या दोघांचे प्रेम, रुसवे फुगवे आलेच आणि मग सरतेशेवटी गाणे हे ही आलेच, त्याशिवाय चित्रपट कसा पूर्ण होणार!) नेहमीसारखा त्याला एक ‘गॉडफादर’ (शरद पवार) भेटतो आणि मग नायक नोकरी सोडतो आणि राजकारणात उतरतो. आधी आमदार, मग राज्यमंत्री, त्यात नायकाने केलेली धडाडीची कामे असा सगळा सोपस्कार करीत गोष्ट चालत राहते. मग नायक आपल्या ‘गॉडफादर’लाच डिच्चू देतो आणि गोष्टीत रंगत(?) आणतो, मग पुढे तो सहावेळा मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करतो, आणि शेवटी तो मुख्यमंत्री होतोच. यानंतर मात्र तो मागे वळून पाहतच नाही. मुख्यमंत्री मग राज्यपाल नंतर केंद्रीय उर्जामंत्री आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री अश्या यशाच्या अनेक पायऱ्या चढतो आणि दिग्दर्शकाची महत्वाची असणारी गोष्ट संपते.

चित्रपटात कोणी आणि कसे काम केले आहे?

या चित्रपटाचा नायक एकूण चार भूमिकांमध्ये चित्रपटात आहे. बालपणीचा नायक आदित्य गानू(दगडू उर्फ प्रसन्नकुमार शिंदे) या बालकलाकाराने साकारला आहे व त्याला तो बऱ्याप्रकारे जमला आहे. पुढे येतो तो तरुणपणीचा नायक, तो म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. एका चांगल्या कलाकाराचे वाईट काम म्हणजे सिद्धार्थरुपी नायक. धडधडित खोटी वाटणारी मिशी आणि त्या बरोबर कृत्रिम वाटणारा अभिनय आपल्या डोळ्याला खटकतोच. त्यानंतरचा प्रौढ नायक संदीप मेहता यांनी साकारला असून त्यांच्या वाट्याला पाच ते सात प्रसंग आले आहेत. पण दिग्दर्शकाने खरी हद्द केली आहे ती अतिप्रौढ किंवा वयोवृद्ध नायकाबरोबर. विक्रम गोखलेंसारखा एवढा चांगला अभिनेता दिग्दर्शकाने अगदी वाया घालवला आहे. काही प्रसंगांमधून ते अगदीच ठळक दिसून येते. याव्यतिरिक्त आनंद इंगळे(भरतराव परब) यांनी साकारलेला ‘गॉडफादर’, जो आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. तो त्यामानाने भाव खाऊन जातो. बाकी नेहा पेंडसे, स्मिता सरवदे, भारती पाटील, पुर्वी भावे यांचा वावर हा गोष्ट चालू ठेवण्यासाठी होतो. सोबतीला अजून काही निव्वळ योगायोगाने आलेली पात्रे आणि घटना चित्रपटात आहेत ज्यांना आपण अगदी जवळून ओळखतो.

पटकथेवर जास्त मेहनत घेण्याची गरज पडली नसावी. कारण इथे पुन्हा निव्वळ योगायोग लेखकाने साधला आहे. सुशीलकुमारांची आपण अनेकवेळा ऐकलेली कथा हुबेहूब साकारायची होती. मात्र ‘निष्ठावान’ आणि दिल्लीचे खास सुशीलकुमार निट दिसत नाहीत. मात्र, काल्पनिक पण योगायोगाने सत्य असणाऱ्या घटनांचा वापर करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. फक्त यातील पात्रांची नावे, मात्र त्यांनी खरोखरच काल्पनिक ठेवली आहेत, पण प्रेक्षक सुजाण असल्याने त्याला ते समजण्यास उशीर लागत नाही. संगीत अशोक पत्कींचे आणि शब्द दासुंचे असले तरी ते चित्रपटात कुठे आहेत, हे प्रेक्षकाला पटकन समजत नाही आणि समजलेच, तर ते का आहेत असे वाटत राहते.

दलित नेत्याचा सर्वोच्च पदावर पोचण्याचा संघर्ष दाखवायचा की त्याचे चरित्र मांडायचे यात दिग्दर्शकाची गल्लत झाली आहे. ज्याने ‘बिनधास्त’, ‘संत तुकाराम’ यांसारखे चित्रपट बनविले त्या चंद्रकांत कुलकर्णीकडून झालेल्या साध्या चुका एक रसिक म्हणून बघविल्या जात नाहीत. पत्रकार परिषद हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असतो, भाषण करण्याची सभा नव्हे, एवढा साधा संकेत दिग्दर्शक विसरून जातो. चित्रपटाचे सेट, तर अगदीच मामुली आणि खोटे वाटावे, असे आहेत.

चित्रपट पाहावा का?

प्रश्न हा आहे, की हा चित्रपट का बनविला आहे? सुशीलकुमारांचा जीवन प्रवास अनुभवायचा असेल, तर एकदा पाहू शकता, पण जर चंद्रकांत कुलकर्णींचा चित्रपट असे समजून चित्रपटाला जाणार असाल, तर तुमची घोर निराशा होऊ शकते. कारण ती चंद्रकांत कुलकर्णी, अजित आणि प्रशांत दळवी यांची नव्हे, तर दुसरीच गोष्ट आहे.