प्रवीण लुलेकर
अगदी हूबेहूब तुमच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती तुमच्यासमोर
अचानक येते. यात तुम्हाला गंमतीचा भागच जास्त वाटू शकतो. ‘हम दोनो’पासून ‘जुडवा’पर्यंत आपण
सिनेमात, अशा कथानकाला विनोदी ढंगानेच पाहात आलोय.
मराठीत या बाबतीत लक्ष्याच्या ‘शेम टू शेम’ने असंख्य एकसारख्या दिसणाऱ्या जोड्या दाखवून कहरच केला होता. सचिनच्या ‘आमच्यासारखे आम्हीच’ची मांडणी थेट शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’शी नातं सांगणारी! अशा एखाद्या घटनेचं वास्तवाशी मुळातच नातं थोडं सैल. त्यातून तिचे गंभीर
परिणाम तपासून पाहणं,मनोरंजनाच्या ठोकताळ्यांमध्ये सिनेमाला
जमलं नसावं. सुधा मूर्तींच्या कथेवर आधारित नितीश भारद्वाज यांनी दिग्दर्शित
केलेला ‘पितृऋण’ हा, मात्र वेगळा प्रयत्न करतो.
चित्रपटाची कथा सांगताना परीक्षण थोडं बोथट होतं. ‘पितृऋण’च्या बाबतीत, तर असे अनेक बारकावे आहेत, जे चित्रपटगृहातच पहावेत. व्यंकटेश कुलकर्णी (सचिन खेडेकर) या
पुरातत्त्वशास्त्राच्या प्राध्यापकावर असणाऱ्या त्यांच्या वडिलांचं एक ऋण, अशी एका ओळीत, या चित्रपटाची कथा आहे. हे ऋण अर्थातच
छुपे आहे. त्याचा शोध लागताना होणाऱ्या गंमती, त्यामागच्या
रहस्याचा उलगडा होताना, होणारा मानसिक त्रास आणि ज्या
भूतकाळाचा शोध कुलकर्णी घेत आहेत, त्याच्या दोन अधुऱ्या,
अतृप्त बाजू – भागीरथी (तनुजा) आणि
कुलकर्णींची आई (सुहास जोशी) हा चित्रपटाचा प्रवास.
भागीरथीचा मुलगा हा, हुबेहूब कुलकर्णींसारखा दिसतो.
त्याचे नावही व्यंकटेशच! (योगायोग!) दोन्ही व्यंकटेशांची एकमेकांशी भेट आणि
भागीरथीने प्राध्यापक कुलकर्णींना सांगितलेली, तिची
पूर्वायूष्याची कहाणी, याने चित्रपटाचा पहिला भाग व्यापलेला
आहे. इथे कथेची गती, अगदी साहित्याच्या अंगाने जाते. एक एक
पात्र, हळू हळू पुढे येतं, आजूबाजूचे
सगळे दृश्य महेश अणेंचा कॅमेरा व्यवस्थित टिपतो, कौशल
इनामदारांची गीतं, गावकरी व्यंकटेशचा निर्मळपणा, भागीरथीच्या कथेतला शृंगार, स्वरबद्ध करतात. एकूण
संयत गतीने सगळी पार्श्वभूमी प्रस्थापित होते. पण इथे काही (अगदीच बारीक) तपशील
चुकतात आणि ते लक्षात यायला वेळही मिळतो. इथेच कथेचा एकूण बाजही लक्षात येतो.
‘पितृऋण’
हा गंभीर असला, तरी वास्तववादी सिनेमा नाही.
हुबेहूब दिसणाऱ्या दोन व्यक्ती, ही मुळाशी असणारी परिस्थितीच
आधी म्हंटल्याप्रमाणे काहीशी अविश्वसनीय आहे. या कथेचा गाभा तिच्यातील मानवी भावना
आहेत, ज्या अगदी अस्सल आहेत. तीनही प्रमुख कलाकारांच्या
सुंदर अभिनयामुळे, या भावना आणखीनच भिडतात. भागीरथीची वेदना
हा, खरं तर कथेचा सगळ्यात चटका लावून जाणारा भाग. ‘तिच्या डोळ्यांत मी अशी शांतता पहिली आहे, जी फक्त
तीव्र तिरस्कारातून निर्माण होते’ असं जेव्हा प्राध्यापक
कुलकर्णी, तिच्याबाबत म्हणतात, तेव्हा
ते थेट मनाला भिडतं. कारण चित्रपटात तनुजा, त्यांच्या
डोळ्यांत ती शांतता खरंच घेऊन वावरतात. ‘झाकोळ’ या त्यांच्या शेवटच्या मराठी चित्रपटात त्यांनी अशाच एका नात्याची दुसरी,
उद्विग्न बाजू उभी केली होती. ‘पितृऋण’च्या निमित्ताने त्याच धाग्याचा दुसरा किनारा बांधला जातोय!
सगळ्यात कमी वाव मिळणारी भूमिका, कदाचित सुहास
जोशींच्या वाट्याला आली आहे. पण भागीरथी इतकीच त्यांच्या पात्राची कैफियतही लक्षात
राहते. ५५ वर्षांच्या विफल, प्रेमहीन संसाराचा सारा उद्रेक,
त्यांच्या शांत मुद्रेत कुठूनतरी डोकावत असतो. मुद्राभिनय आणि
संवादफेकीच्या बळावर सुहास जोशी, हे पात्र जिवंत करतात. सचिन
खेडेकर, प्राध्यापक कुलकर्णींची घालमेल तळमळीने रंगवतात. आपण
कथा त्यांच्या दृष्टीने पाहत असल्याने रहस्यात आपल्याला ओढून नेण्याचं काम त्याचं
आहे. हे काम ते सचोटीने करतात. हे रहस्य, तसे फारसे
आश्चर्यकारक नाही. पण दुसऱ्या भागात घटनांच्या तुफान गतीने, तसेच
पात्रांच्या आणि त्यांच्या नात्यातील गुंतागुंतीमुळे शेवटाकडे जाताना
प्राध्यापकांसह आपल्याही भावनांचा निचरा होतो. पूर्वी भावे (कुलकर्णींची मुलगी),
केतकी पालव (तरुण भागीरथी) आणि इतर तरुण मंडळी मात्र काहीसे फिके
पडतात.
Read English review here
0 comments:
Post a Comment